प्रिय ……
अशा वेड्या टप्प्यावर सगळच कस सैरभैर होत
कळत पण वळत नाही अन मन दुखायचे ते दुखतेच
कशाचच अप्रूप नाही अस वाटता वाटत कळत
की मन तर तसच आहेच की आपल
काहीतरी मोलाच शोधणार अन ते गवसल्यावर
अशा वेळी का अस समजल म्हणून हळहळणार
अपेक्षांची ओझी वाहता वाहता अन सातत्यान
निराश होणार मन कोणती सावली दिसली
एक अनोखी मृदू तरीही कणखर अशी ओल लाभू पहिली
की टवटवीत होऊ बघत अन परत घाबरत स्वतःलाच
आता गणित वेगळी आता वाटा मळलेल्या
आता स्वप्न ठरवलेली अन अशा अनवट सहवासाच
चांदण आता कस लाभायच
अन त्या चांदण्याला आपल्यामुळे कशी वेदना द्यायची ?
आता कोणती स्वप्न बघायची अन काय काय
बेचिराख होऊ द्यायचं ?
आता वेडे हटट कसे जागवायचे ?
आता काहीही गृहीतच का धरायचं ?
तरीही सल उरतात, तरीही डोळे ओलावतात
तरीही वाटून जातच की छोटेमोठे आनंदही
फक्त नात्याच्या कोंदणात बसवता येतात
फक्त परीघापेक्षा वेगळ काही रुजतंय म्हणून ,
असच खूप छान वाटल म्हणून काही हिरव्या
नागमोडी वाटेवर लांबलचक फिरता येणार नाही
उगाचच आवडती पुस्तक घ्यायला, एक कप कॉफी
फक्त तुझ्यासमवेत प्यायला
कधीच जमणार नाही
मेंदीचे लालचुटुक हात उगाचच हातात घेऊन बघता येणार नाहीत
अन केसांची सुरेख महिरप निर्हेतुकपणे सुद्धा निरखून पाहता येणार नाही
एखादी सुंदर गझल नुसतेच एकमेकांचे हात हातात घेऊन ऐकणे होणार नाही
अशीच एक वेदनेची लकेर डोळ्यात दिसली म्हणून कधी स्पर्श करता येणार नाही
उतरत्या संध्याकाळची हुरहूर नुसतच शेजारी शांत बसून कधी हृदयात उमटवता येणार नाही
आता अंतर वाढवू तरी ते होणार नाही अन
आता अंतर कमी होईल हे कोणत्याच कोष्टकात बसणार नाही
फक्त एक मात्र नक्की की
परत असा मनाचा वेगळाच गोंधळ
परत एकदा जीवाची अटळ तडफड
परत एकदा फुले पाने पहाट अन उत्तररात्र यात
भरून राहिलेली हुरहुरती आठवण
मनावर एक फुंकर घालत राहील
नात्यापालीकडले नाते माझ्या मनामनात उतरत जाईल …….
हरीश
No comments:
Post a Comment