Monday, 5 August 2024

आपलं मराठीपण

 आपले मराठीपण #1


आपले मराठी असणे हे मुळातच जन्मतः मिळालेलं उपजत अस देणं आहे.बालपणी आई म्हणून मारलेली पहिली हाक, ज्ञानेश्वरीचे लता दिदींचे अवीट गोडीचे , गीत रामायण मधले अजरामर सुधीर फडके यांनी संस्कारित करत नेलेले हे मराठीपण!


गदिमांचे नाच रे मोरा आंब्याच्या बनात, शाळा सुटली पाटी फुटली, आई मला भूक लागली पासून सुरू झालेला प्रवास राकट देशा खडतर देशा म्हणणारे विंदा, हिरवे हिरवे गार गालिचे मखमालीचे तृण फुलांचे सांगत मोहवणारे बालकवी, पृथ्वीचे प्रेमगीत रचणारे कुसुमाग्रज किती तरी दिग्गज आपल्या माय मराठीची लेकरे आहेत. यांच्या शब्दांमध्ये आपण रंगत गेलो. पाडगावकरांनी तरुण मनाला लोभवत लिहिलेला बोलगाणी कवितासंग्रह अन त्यातल्या तरुण मनाला थेट भिडणाऱ्या कविता हे एक मोठं गारुड आपण अनुभवलं. 


या दुव्याला अनेक वर्षांनी जोडत संदीप खरे, वैभव जोशी, गुरू ठाकूर यांनी मराठी गाण्याला ताजा टवटवीत आयाम दिला. हे सर्व झाले कवितांचे , गाण्यांचे. ललित लेखन, कथा, कादंबरी, नाटके मराठीत किती अप्रतिम लिहिली गेली. पु ल देशपांडे, व पु काळे, व्यंकटेश माडगूळकर, रवींद्र पिंगे, जयवंत दळवी, विजय तेंडुलकर, गूढ अलौकिक प्रतिभा लाभलेले जी ए कुलकर्णी , एक वेगळाच पायंडा पाडून चाकोरीबाहेर भरीव लिहिणारे कोसला कार

भालचंद्र नेमाडे, रंगनाथ पठारे, राजन खान, अरुण साधू, अनिल बर्वे आणि अनेक.


ऐतिहासिक , पौराणिक कादंबऱ्यांचे वेगळे स्थान निर्माण करणारे रणजित देसाई, शिवाजी सावंत त्यांची श्रीमान योगी आणि मृत्युंजय वाचत कित्येक पिढ्या मंत्रमुग्ध झाल्या.


रत्नाकर मतकरींच्या गूढकथा, नारायण धारपांच्या भयकथा यांचे गारुड वेगळेच. त्यातील अनुभूती अनुभवण्याजोगीच.


स्त्री लेखिका आणि कवयित्रींनीं देखील मराठीत अतिशय सरस कामगिरी केलेली आपण अनुभवली.

विभावरी शिरूरकर यांचे कळ्यांचे निश्वास, गौरी कुलकर्णींच्या कथा अन कादंबऱ्या, नीरजा, सुमती क्षेत्रमाडे, प्रिया तेंडुलकर, सानिया, आशा बगे या सर्व मानवी नात्यांचे विविध पदर उलगडणाऱ्या महान लेखिका.


आत्मचरित्रे अन त्यातून मांडलेले प्रांजळ , प्रेरक, कधी दुःखद अनुभव मांडणारे विश्राम बेडेकर, लक्ष्मीबाई टिळकांचे स्मृतिचित्रे, आचार्य अत्रेंचे कऱ्हेचे पाणी, विजया मेहतांचे झिम्मा, सुनीती देशपांडेंच आहे मनोहर तरी, लक्ष्मण मानेंच उपरा, दया पवारांचं बलुत, मल्लिका अमर शेख यांचं मला उध्वस्त व्हायचंय, अशी कित्येक महत्वाची , मापदंड असावीत अशी पुस्तक.


अलीकडच्या काळात मिलिंद बोकील, गणेश मतकरी, प्रणव सुखदेव, किरण गुरव ही विविधांगी दमदार लेखन करणारी मंडळी.


यामध्ये अनेक महत्वाचे उल्लेख आलेले नाहीत, याची जाणीव आहे. परंतु विपुल, समृद्ध, सर्व स्तरातल्या, सर्व विविध समाजाच्या लोकांनी उत्तमोत्तम लिहून आपली माय मराठी संपन्न केलेली आहे आणि ही प्रक्रिया निरंतर सुरू आहे.


कमालीचा वेग पकडलेलं अन स्क्रीनला चिकटलेले आपले आयुष्य वाचकांची संख्या कमी करत आहे.

वाचन, मनन, सकस लेखन कमी होते आहे.

म्हणून सजगपणे, प्रयत्नपूर्वक मराठी असण्याचा अभिमान अन ही समृद्ध भाषा टिकायला हवी.


डॉ हरीश सोपान सरोदे

आपले मराठीपण #२


लेखन  भाषानिर्मिती  वृद्धीचा अविभाज्य भाग असतो त्यासोबत प्रांता प्रांतात जी भाषा असते तीदेखील या समृद्धीच्या  वारशात मोलाची भर घालत असते.


पुण्यातली शुद्ध बोलीभाषा, नगरकडची ग्रामीण भाषा, जळगावकडचा वेगळ्या ढंगातील भाषेचा गोडवा, अहिराणी भाषा, विदर्भातील भाषा, मराठवाड्यातील भाषा, कोकणी भाषा, सातारा कोल्हापूरची बोलीभाषा  या सगळ्याचा एक विशिष्ट लहेजा मराठी वाढवत गेला.

उदाहरण द्यायचे तर ज्येष्ठ कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी लिहिलेली जीवनाचे सुखदुःख साध्या सोप्या बोलीभाषेत मांडणाऱ्या कविता :

अरे संसार संसार,

जसा तवा चुल्ह्यावर

आधी हाताले चटके

तवा मिळते भाकर,

अरे संसार संसार,

खोटा कधी म्हणू नये

राऊळाच्या कयसाले

लोटा कधी म्हणू नये

( हाताले- हाताला तवा-तेव्हा  कयसाले- कळसाला)


असे विविध शब्द, त्यांचे उच्चार, अर्थ हे सर्व मराठीत झिरपत गेलं. उच्चारांचे ढंग, भाषेचा लहेजा यावरून कोणत्या प्रदेशातील व्यक्ती असेल याचा अंदाज बांधता येतो तथापि लवचिक मराठीने हे शब्द आपल्या वैभवात घेऊन टाकले आहेत.


आताच शिक्षण अन त्यातील माध्यम हे बरेच वर्षांपासून बदलत इंग्लिश मध्ये प्रामुख्याने गेलं. परंतु ज्या घरांमध्ये मराठी वापराची रोजची संवादाची भाषा म्हणून बोलली जाते, तिथे अन आता पन्नाशीच्या पिढीतल्या मराठी लोकांसाठी विचार करणं, व्यक्त होणं, मनात चिंतन करणं हे मराठीतच होत अन ते मराठीत बोलणं, लिहिणं, व्यक्त होणं हे जाणीवपूर्वक करणे आपल्या आप्तजनांना आग्रह करणे फार महत्वाचे आहे.


एक मोठा समूह भाषा वापरत राहिला तर ती भाषा टिकून रहाते. वाढत्या स्क्रीन टाईमच्या वापरात वाचनाचे महत्व जगभर कमी होते आहे. पुण्यासारख्या पूर्ण मराठी शहरात खाजगी ग्रंथालये ज्यामध्ये विपूल ग्रंथसंपदा आहे ती बंद पडत आहे.

मुलांची भाषा, तरुण पिढीतील भाषा धेडगुजरी आहे.

आपल्या भाषेतील उत्तमोत्तम लेखन, कविता, ललित लेखन जतन करून टिकवून ठेवण्यासाठी आपल्यालाच, मराठी जनांना प्रयत्न करायला हवेत.


मराठीपण भाषेत तर वेगळे आहेच पण इतरदेखील काही बाबींमध्ये मराठीपण ठसा ठेवून आहे. 

त्यातील महत्वाचा आणि आनंदाचा भाग म्हणजे आपले पदार्थ.


वाफाळता वरणभात आणि साजूक तूप, मसालेभात, बिरड्याची आणि इतरही उसळी, अळूची भाजी, पदर असलेल्या मऊसूत पोळ्या, दही ताक कढी , दहीभात, बटाट्याची भाजी, ताकातल्या भाज्या, आमसुलाची कढी, विविध पालेभाज्या, वाटली डाळ,

पुरणपोळी अन कटाची आमटी, गुळपोळी , खान्देशी भरीत, शेवांची भाजी , वरणबट्टी, नागपुरी वडाभात आणि तर्री, वैदर्भीय मिरच्यांची रसाभाजी, सातारा कोल्हापूरचे मटण, कोंकणी पद्धतीचे मासे ,, एक ना अनेक!

हे सर्व अनुभवलेला, चाखलेला माणूस म्हण्जेदेखील मराठीपण! 


गणपती, गौरी, दसरा, दिवाळी, पाडवा याने ज्याला प्रसन्न उत्सवी वाटते ते म्हण्जेदेखील मराठीपण.


पोहे, शिरा, सांजा, साबुदाणा खिचडी मनोमन खावीशी वाटणे, मराठी गाणे, नाट्यसंगीत ऐकावेसे वाटणे, सखी मंद झाल्या तारका अथवा अजुनी रुसुनी आहे , पैल तोगे काऊ कोकताहे ऐकून एक अनाम शिरशिरी भासणे हे सर्व मराठीपणच.


हे अस्सल वैभव जपण्यासाठी, ज्ञानेश्वरांनी सांगून ठेवले आहेच:

माझा मराठीची बोलू कौतुके

परि अमृतातेही पैजा जिंके

ऐसी अक्षरे रसिके, मेळवीन 


@डॉ हरीश सोपान सरोदे

Saturday, 5 November 2016

 सांज गहिरी होताना 
 वाटा सावळ्या होताना 
 पक्षी घरटी निजताना 
 आठवणींचे सोनपक्षी उडताना 
 तुझ्या समवेत असण्याच्या 
  स्वप्नातील माझ्या गावी 
 शांत स्वच्छ निशब्ब्द रात्र

 शब्द  जिथे निषिद्ध 
  अन मौन असे ही भाषा 
 डोळ्यातील ओलाव्याने 
 भरतात जुन्या त्या जखमा 

 कैफात दौडते  जग 
 ते कधीच आपुले नव्हते 
 ओंजळीत होती स्वप्ने 
 पण ओंजळ हरवून गेली 

 त्या तिथे स्वप्नातील अंगणी 
 जातात विसरुनी सल 
 विसरुनी भिडतील काहुरे 
 तुजसवे हसे चंद्रकोर 

 त्या गावी तू नित्य असावे 
अन खळाळत कधी हसावे 
अन गर्द प्रेमाच्या छायेत 
तुजसवे मज  लपेटून घ्यावे 

हरीश 

 

Thursday, 3 November 2016

कधीकधी मला तुझा नुसताच आवाज ऐकावासा वाटतो 
कधीकधी मला तुझा फोटो बघावासा वाटतो 
 
कधीकधी मला नुसतीच स्वप्ने पहायची असतात 
तुला घेऊन पुस्तक वाचायचं असत 
सुंदर गाण ऐकायचं असत 
तुझा हात स्पर्शायचा असतो 
पारिजातकाची शुभ्र नाजूक फुल तुझ्यावर 
उधळायची असतात 
हिरव्यागार वाटेवर पक्ष्यांची किलबिल ऐकत 
निशब्द चालायचे असते 

कधीकधी मला तुझ्या कुशीत झोकून द्यायचं असत 
छोटे-मोठे न संपलेले टोचते सल संपवायचे असतात 

कधीकधी मला तुला मग्न कामात बघायचे असते 
तुझी लगबग ,एका बाजूला पूर्ण होत जाणारी काम 
एका बाजूला सांभाळलेली इतर चपखल व्यवधान बघून 
तुझे कौतुक करायचे असते 

कधीकधी मला असे वाटत रहाते 
की तुलासुद्धा माझ्यासाठी कधी अस वाटत असेल का 
आकाशात उडणारा पांढराशुभ्र पक्षी पाहून 
माझ्या आठवणीने काळजाचा  एखादा ठोका चुकत असेल का ?

हरीश 




नाती फुलत जातात अंदाज घेत कधी , 
 अंदाज देत नेमक्या समेच्या जागांना दाद देत, 
 नेमक्या हळव्या जागांना हळवा आश्वासक स्पर्श करत 
 बरसवत कधी आनंदाचे टपटपते क्षण 
 सुवासभरल्या आनंदाच्या अंगणात 
तर कधी कवेत घेतात मिटून जाणार 
उदासलेल मन 

नाती कधीही जडतात 
आपल्या अंदाजांशिवाय 
आपल्या मनात हात पुढे करून बागडायला 
उत्सुक मूल असत तेव्हा अन 
रुसून आपले अश्रू कोणाला न दाखवता 
हट्टाने एकट बसून रहाणार मुल असल तरीही 

नाती घट्ट होत जातात निर्हेतुक वाटलेल्या 
परंतु आपुलकीचा स्पर्श असलेल्या छोट्याशा गोष्टीतून 
तर कधी काही न बोलता दिसलेल्या नजरेतल्या आधारावरून 
 
नाती जेव्हा अपेक्षा ठेवतात तेव्हा तुटत जातात 
एकेमेकांचे जपलेले  छोटे छोटे हट्ट,
कोवळ्या जागा कठोर जागा निसटून जाऊन 
उभ्या रहातात वेगळ्याच मितीमध्ये 
दुराग्रहाची अन मूढपणाची अन स्वार्थीपणाची  
स्वघातकी दारे उघडत मिटत 

तरीही नात असावच लागत 
अन त्याला नावही असावच लागत 
कपाळावरच्या कुंकवासारख 
लक्ष्मणरेषा आखून ठेवणार नेमस्त पण हुरहुरत 

हरीश    
 
पहाटेच्या गारव्यात सुंदरशा धुक्यात 
सांग  कधी सोबत येशील का 
उगाच हातात हाताला गुंफून दोन चार 
 पावलं चालशील का 

बेफान पावसात सरींच्या तडाख्यात 
छत्रीत बिलगून चालशील का 
अवचित उगवलेल इंद्रधनू  पाहून 
तुझ्या डोळ्यांची पाखर हसतील का 

निळ्या आकाशात पांढरा बगळा  
नखावरच्या कवड्या मोजशील का 
लालचुटुक चिंचेच आंबट बुटुक  
डोळे मिटून स्स म्हणून सुखावशील का 

ग्रीष्मात लालभडक फुललेला गुलमोहोर 
बघून सांग हरखून  जाशील का 
चांदण्या रात्रीत आकाशाखाली तारे 
मोजत तू  सांग निजशील का 

जगाला विसरून स्वतःला विसरून 
माझ्यासाठी तू कधी असशील का 
माझ्याच स्वप्नात तुझ्या स्वप्नांचा 
आरसा पाहून हासशील का  

हरीश 
एकट कधी बसू नये 
 उतरत्या सांजेला डोळ्यात आसू आणू नये 
 जुनेपाने संदर्भ अन संकेत अन आजच्या 
 आयुष्याची संवेदनशुन्यता यांची तुलना करू नये 

 डोळ्यादेखत संपणारी नात्या नात्यातली ओल बघून 
 उगीच सेंटी होऊ नये 
 घरादारात मुरून असलेला कोरडा माहोल 
 उगाच फुका गहिवरून व्यर्थ बदलायला पाहू नये 

  फार मनापासून कोणाशी कधी बोलू नये 
 खरीखुरी दुक्खे अन बोचणारे काटे आपल्यापाशीच ठेवावेत 
 आपल्याच बुडणाऱ्या मनात त्यांचे भक्कम जहाज बनवावे 
 जमलेच तर आपण ते हळूहळू सफरीवर न्यावे 
 अन झेपलेच तर आठवणींच्या बेटांवर ते नांगरावे 

  हरीश 

प्रदीर्घ मौनांच्या वाटा 
प्रदीर्घ प्रतिक्षेची उत्तर 
न सोडवता येणारे कूटप्रश्न 
अन तरीही मखमली छायेची अपेक्षा 
ठेवणार मानवी मन 

उगाचच खेळायच्या लुटुपुटूच्या लढाया 
उगाचच मनात दाटून येणार काहूर 
व्यवहारांच्या पातळ्यांवर पदोपदी 
ठोकरल जाणार दुबळ मन 

उत्तरांची अपेक्षा नसलेले मूढ प्रश्न 
त्यात गुंगून जाऊन उगाचच बेचिराख झालेली 
वेडी आशाळभूत आयुष्य 
एखादे स्वप्न अप्राप्य वाटणारे खरे होऊ पहिले 
तर त्याच्या झगझगीत तेजाने येणारे आंधळेपण 

प्रवाहाबरोबर अथक वहात अर्थ न सापडलेली बहुतेक आयुष्य 
अन त्याला सुखासीनता अन वृथा यशांची लटकलेली खोटी तोरण 
भरल्यापोटी सुचणारी नाजूकसाजूक  भाकड व्यवधान 
अन आतून कुरतडणार गप्प बसवलेल मन 

हरीश