Saturday, 5 November 2016

 सांज गहिरी होताना 
 वाटा सावळ्या होताना 
 पक्षी घरटी निजताना 
 आठवणींचे सोनपक्षी उडताना 
 तुझ्या समवेत असण्याच्या 
  स्वप्नातील माझ्या गावी 
 शांत स्वच्छ निशब्ब्द रात्र

 शब्द  जिथे निषिद्ध 
  अन मौन असे ही भाषा 
 डोळ्यातील ओलाव्याने 
 भरतात जुन्या त्या जखमा 

 कैफात दौडते  जग 
 ते कधीच आपुले नव्हते 
 ओंजळीत होती स्वप्ने 
 पण ओंजळ हरवून गेली 

 त्या तिथे स्वप्नातील अंगणी 
 जातात विसरुनी सल 
 विसरुनी भिडतील काहुरे 
 तुजसवे हसे चंद्रकोर 

 त्या गावी तू नित्य असावे 
अन खळाळत कधी हसावे 
अन गर्द प्रेमाच्या छायेत 
तुजसवे मज  लपेटून घ्यावे 

हरीश 

 

Thursday, 3 November 2016

कधीकधी मला तुझा नुसताच आवाज ऐकावासा वाटतो 
कधीकधी मला तुझा फोटो बघावासा वाटतो 
 
कधीकधी मला नुसतीच स्वप्ने पहायची असतात 
तुला घेऊन पुस्तक वाचायचं असत 
सुंदर गाण ऐकायचं असत 
तुझा हात स्पर्शायचा असतो 
पारिजातकाची शुभ्र नाजूक फुल तुझ्यावर 
उधळायची असतात 
हिरव्यागार वाटेवर पक्ष्यांची किलबिल ऐकत 
निशब्द चालायचे असते 

कधीकधी मला तुझ्या कुशीत झोकून द्यायचं असत 
छोटे-मोठे न संपलेले टोचते सल संपवायचे असतात 

कधीकधी मला तुला मग्न कामात बघायचे असते 
तुझी लगबग ,एका बाजूला पूर्ण होत जाणारी काम 
एका बाजूला सांभाळलेली इतर चपखल व्यवधान बघून 
तुझे कौतुक करायचे असते 

कधीकधी मला असे वाटत रहाते 
की तुलासुद्धा माझ्यासाठी कधी अस वाटत असेल का 
आकाशात उडणारा पांढराशुभ्र पक्षी पाहून 
माझ्या आठवणीने काळजाचा  एखादा ठोका चुकत असेल का ?

हरीश 




नाती फुलत जातात अंदाज घेत कधी , 
 अंदाज देत नेमक्या समेच्या जागांना दाद देत, 
 नेमक्या हळव्या जागांना हळवा आश्वासक स्पर्श करत 
 बरसवत कधी आनंदाचे टपटपते क्षण 
 सुवासभरल्या आनंदाच्या अंगणात 
तर कधी कवेत घेतात मिटून जाणार 
उदासलेल मन 

नाती कधीही जडतात 
आपल्या अंदाजांशिवाय 
आपल्या मनात हात पुढे करून बागडायला 
उत्सुक मूल असत तेव्हा अन 
रुसून आपले अश्रू कोणाला न दाखवता 
हट्टाने एकट बसून रहाणार मुल असल तरीही 

नाती घट्ट होत जातात निर्हेतुक वाटलेल्या 
परंतु आपुलकीचा स्पर्श असलेल्या छोट्याशा गोष्टीतून 
तर कधी काही न बोलता दिसलेल्या नजरेतल्या आधारावरून 
 
नाती जेव्हा अपेक्षा ठेवतात तेव्हा तुटत जातात 
एकेमेकांचे जपलेले  छोटे छोटे हट्ट,
कोवळ्या जागा कठोर जागा निसटून जाऊन 
उभ्या रहातात वेगळ्याच मितीमध्ये 
दुराग्रहाची अन मूढपणाची अन स्वार्थीपणाची  
स्वघातकी दारे उघडत मिटत 

तरीही नात असावच लागत 
अन त्याला नावही असावच लागत 
कपाळावरच्या कुंकवासारख 
लक्ष्मणरेषा आखून ठेवणार नेमस्त पण हुरहुरत 

हरीश    
 
पहाटेच्या गारव्यात सुंदरशा धुक्यात 
सांग  कधी सोबत येशील का 
उगाच हातात हाताला गुंफून दोन चार 
 पावलं चालशील का 

बेफान पावसात सरींच्या तडाख्यात 
छत्रीत बिलगून चालशील का 
अवचित उगवलेल इंद्रधनू  पाहून 
तुझ्या डोळ्यांची पाखर हसतील का 

निळ्या आकाशात पांढरा बगळा  
नखावरच्या कवड्या मोजशील का 
लालचुटुक चिंचेच आंबट बुटुक  
डोळे मिटून स्स म्हणून सुखावशील का 

ग्रीष्मात लालभडक फुललेला गुलमोहोर 
बघून सांग हरखून  जाशील का 
चांदण्या रात्रीत आकाशाखाली तारे 
मोजत तू  सांग निजशील का 

जगाला विसरून स्वतःला विसरून 
माझ्यासाठी तू कधी असशील का 
माझ्याच स्वप्नात तुझ्या स्वप्नांचा 
आरसा पाहून हासशील का  

हरीश 
एकट कधी बसू नये 
 उतरत्या सांजेला डोळ्यात आसू आणू नये 
 जुनेपाने संदर्भ अन संकेत अन आजच्या 
 आयुष्याची संवेदनशुन्यता यांची तुलना करू नये 

 डोळ्यादेखत संपणारी नात्या नात्यातली ओल बघून 
 उगीच सेंटी होऊ नये 
 घरादारात मुरून असलेला कोरडा माहोल 
 उगाच फुका गहिवरून व्यर्थ बदलायला पाहू नये 

  फार मनापासून कोणाशी कधी बोलू नये 
 खरीखुरी दुक्खे अन बोचणारे काटे आपल्यापाशीच ठेवावेत 
 आपल्याच बुडणाऱ्या मनात त्यांचे भक्कम जहाज बनवावे 
 जमलेच तर आपण ते हळूहळू सफरीवर न्यावे 
 अन झेपलेच तर आठवणींच्या बेटांवर ते नांगरावे 

  हरीश 

प्रदीर्घ मौनांच्या वाटा 
प्रदीर्घ प्रतिक्षेची उत्तर 
न सोडवता येणारे कूटप्रश्न 
अन तरीही मखमली छायेची अपेक्षा 
ठेवणार मानवी मन 

उगाचच खेळायच्या लुटुपुटूच्या लढाया 
उगाचच मनात दाटून येणार काहूर 
व्यवहारांच्या पातळ्यांवर पदोपदी 
ठोकरल जाणार दुबळ मन 

उत्तरांची अपेक्षा नसलेले मूढ प्रश्न 
त्यात गुंगून जाऊन उगाचच बेचिराख झालेली 
वेडी आशाळभूत आयुष्य 
एखादे स्वप्न अप्राप्य वाटणारे खरे होऊ पहिले 
तर त्याच्या झगझगीत तेजाने येणारे आंधळेपण 

प्रवाहाबरोबर अथक वहात अर्थ न सापडलेली बहुतेक आयुष्य 
अन त्याला सुखासीनता अन वृथा यशांची लटकलेली खोटी तोरण 
भरल्यापोटी सुचणारी नाजूकसाजूक  भाकड व्यवधान 
अन आतून कुरतडणार गप्प बसवलेल मन 

हरीश  
 
सहवासाची चांदणफुले 
उधळत गेली मनात खोल 
अंकुरलेले हिरवे काही 
हळवे त्याचे अनवट बोल 

नाती सगळी असली तरीही 
नाते नवीन जडते नकळत 
आयुष्याच्या वाटेवरती  
फिरून उमटती नवीन रंग 

आभासांची सुंदर नक्षी 
हृदयातली ती अनाम हुरहूर 
शब्दांच्याही पलीकडे जे 
स्पर्शून जाते हळूच अनावर 


हरीश 

 


थंड शिरशिरी आणणारी हवा 
विस्तीर्ण हिरवीगार कुरण 
निळेशार आकाशातले पांढरेशुभ्र ढग 
अन सतत मनाला बिलगलेली तुझी आठवण 

डोळ्याचे पारणे फिटतील एवढे सृष्टीचे रंग 
हिरव्या पिवळ्या लाल पांढर्या छटाच छटा 
एकदम सुरु झालेला जणू कसला महोत्सव 
अन डोळ्यासमोर येत शांतावणारी 
तुझी हसरी प्रतिमा 

नवनवी माणस नवनवे अनुभव 
नवनव्या चवी अन … 
तुझी उत्सुक ,अप्रूपाना सामोर जाऊन 
मुग्ध होणारी नजर ……. कशी असेल 
याने हसणारा मी    

शेवटी आता जगाच्या पाठीवर कुठेही 
गेल तरी खात्री असलेली तुझी आठवण 
नुसत्याच आठवणीने आश्वासन देणारी 
हळुवार आपल्या कुशीत घेऊन शांत करणारी 
तुझी आठवण …. 

हरीश 

एखादा चकाकता क्षण उगवतो 
की आयुष्य हिऱ्यासारख किमती होऊन जातो 
एखादा असाही मलिन क्षण येतो की 
सगळ काही माती माती होऊन जात 
अन त्या मधल्या काटेकोर मर्यादशील 
संकुचित अशा आनंद लोभ हेवा लालसा 
क्रौर्य मतलबीपणा अशा भावनांमध्ये कडेलोट न होऊ 
देता सपक जगत रहातो आपण 

कोणता प्रमाद होऊ नये 
कोणी बोट रोखू नये 
कोणी वाळीत टाकू नये 
कोणी टोचून बोलू नये 
या कातडीबचावू  लाम्बकाला लोम्बकळून 
जगात असतो आपण  
कमवायचं तर खूप असत 
पण गमवायची काही इच्छा नसते 

विझून जातात हृदयात धुमसणारे भाकड वणवे 
अन उध्वस्त होत असतात मनात असेलेली संस्कारित कुंपणे 
तरी तिथेच कोपऱ्यात उभे आपण नेस्तनाबूत सैनिकासारखे 
शस्त्रहीन कणाहीन शिणलेले कुचम्ब्लेले घनदाट 

हळवे आनंद पराजित होत असतात 
अन सरळ साध कधी जिंकत नसत 
या वेदनेसह 
हरीश 
प्रिय …… 


अशा वेड्या टप्प्यावर सगळच कस सैरभैर होत 
कळत पण वळत नाही अन मन दुखायचे ते दुखतेच 
कशाचच अप्रूप नाही अस वाटता वाटत कळत 
की मन तर तसच आहेच की आपल 
काहीतरी मोलाच शोधणार अन ते गवसल्यावर 
अशा वेळी का अस समजल म्हणून हळहळणार  

अपेक्षांची ओझी वाहता वाहता अन सातत्यान 
निराश होणार मन कोणती सावली दिसली 
एक अनोखी मृदू तरीही कणखर अशी ओल लाभू पहिली 
की टवटवीत होऊ बघत अन परत घाबरत स्वतःलाच 

आता गणित वेगळी आता वाटा मळलेल्या 
आता स्वप्न ठरवलेली अन अशा अनवट सहवासाच 
चांदण आता कस लाभायच 
अन त्या चांदण्याला आपल्यामुळे कशी वेदना द्यायची ? 
आता कोणती स्वप्न बघायची अन काय काय 
बेचिराख होऊ द्यायचं ?
आता वेडे हटट कसे जागवायचे ?
आता काहीही गृहीतच का धरायचं ?

तरीही सल उरताततरीही डोळे ओलावतात 
तरीही वाटून जातच की छोटेमोठे आनंदही 
फक्त नात्याच्या कोंदणात बसवता येतात 
फक्त परीघापेक्षा वेगळ काही रुजतंय म्हणून ,
असच खूप छान वाटल म्हणून काही हिरव्या 
नागमोडी वाटेवर लांबलचक फिरता येणार नाही  
उगाचच आवडती पुस्तक घ्यायलाएक कप कॉफी 
फक्त तुझ्यासमवेत प्यायला 
कधीच जमणार नाही 

मेंदीचे लालचुटुक हात उगाचच हातात घेऊन बघता येणार नाहीत 
अन केसांची सुरेख महिरप निर्हेतुकपणे सुद्धा निरखून पाहता येणार नाही 
एखादी सुंदर गझल नुसतेच एकमेकांचे हात हातात घेऊन  ऐकणे होणार नाही 
अशीच एक वेदनेची लकेर डोळ्यात दिसली म्हणून कधी स्पर्श करता येणार नाही
उतरत्या संध्याकाळची हुरहूर नुसतच शेजारी शांत बसून कधी हृदयात उमटवता येणार नाही  
आता अंतर वाढवू तरी ते होणार नाही अन 
आता अंतर कमी होईल हे कोणत्याच कोष्टकात बसणार नाही 

फक्त एक मात्र नक्की की 
परत असा मनाचा वेगळाच गोंधळ 
परत एकदा जीवाची अटळ तडफड 
परत एकदा फुले पाने पहाट अन उत्तररात्र यात 
भरून राहिलेली हुरहुरती आठवण 
मनावर एक फुंकर घालत राहील 
नात्यापालीकडले नाते माझ्या मनामनात उतरत जाईल  ……. 

 हरीश 
मनात सगळे वेडे राघू 
अल्लड हिरवी हळवी सळसळ 
हातावरच्या अतर्क्य रेषा 
फसवून गेले अवघे जीवन 

काय हवे ते कळले  नाही 
येथे मग मन रमले नाही 
व्यर्थ जीवाची तडफड गडबड  
आणिक तरी जगण्याची फडफड 

वाट असे ही अनोळखी जरी  
पटपट सरते मधले अंतर 
अल्लड अवखळ रेशीम सारे 
उडोनी जाते अत्तरासम   

पुढे पसरला माळ अनामिक 
मन हे आता कातर कातर 
तरीही पुढे पडते हे पाऊल 
दिसे  दूर जरी फसवे मृगजळ 

हरीश   
सखीच्या बांगड्या वाजता 
संध्या सावळी होता 
मन अधीर होताना 
रानात आर्त पावा 

पुस्तकी  पिंपळपान जाळीचे 
सुकलेली चार फुले 
कविता युगायुगांची 
जणू ओघळलेले अश्रू 

मनात दडला मोर 
त्याचा पिसारा फुलेना 
भरल्या गोकुळात कधी 
असे कोण एकटा 

क्षण चालला पुढे 
अन मन ओढते मागे 
दूर राहिले मैत्र अन सगेसोयरे 
अन चौकट उभी मध्ये 

हरीश 
काही आर्जव आयुष्यभर शालीन असतात 
याचा अर्थ असा नसतो की ती मनाशी बंड करत नसतात ,
नाईलाजांच्या कोंदणाखाली आक्रोशात राहतात ती 
प्राक्तनाच्या आदेशावर मान तुकवतात ती 
आपल्या स्वतःपेक्षाही दुसऱ्यांचा विचार करतात ती ,
काही अशी आर्जव 

हळवी कोवळी स्वप्न उगवतच असतात 
जर मनाची भूमीच तशी असेल ,
परत परत हिरमुसून आशेच्या हिंदोळ्यांवर 
डोलत असतात काही अशी आर्जव 

आपल्यात असूनही आपल्याबाहेर पाहायला शिकवतात 
आपल्या स्वतःतून चांगुलपणा शोधून त्याची जोपासना करत राहतात, 
क्षणोक्षणी एखादा सल वागवत एका वेगळ्याच परिमाणात जगायला शिकवतात 
अशी काही आर्जव 
 
काही खेळ हरण्यासाठीच असतात 
अन काही अतिप्रिय गमावण्यासाठीच असत ,
हे माहित असून अखेरच्या मुक्कामापर्यंत 
स्वप्न पहात राहतात अशी काही आर्जव 

कधीतरी त्यांचा विजय व्हावा  
कधीतरी त्यांना जगता यावे 
खरेखुरे वाटणारे दोन क्षण अनुभवता यावे 
अशी काही आर्जव ……… 

हरीश 
एखादा वेडा पाऊस डोळ्यांची कड भिजवून जातो 
तेव्हा समजावे की ती तुमच्या निकट आहे 
पावसाचा स्पर्श म्हणजे तिचाच स्पर्श 
ओल्या मातीचा गंध म्हणजे तिच्या भावनांचा अर्थ 
अन टपटपणारे पाणी म्हणजे तिचे अनवट शब्द     

इंद्रधनुचे रंग दिसले की मनाचा ऋतू बदलावा  
सप्तरंगात उत्कट आठवणींचा झरा वहावा 
जरा हसून पाहिलं तर कदाचित तीही दिसेल 
सूर्यकिरण चेहेऱ्यावर घेऊन ती कोवळ हसत असेल 

हिरव्यागार पाऊलवाटेवर जेव्हा आपण चालत असू 
ढगांमध्ये चमकणारी वीज आपण पहात असू 
अवेळी चिवचिवणारी पाखरे बघून चिंता करत असू 
अन अलगद हात हातात गुंफून डोळ्यांमध्ये पहात असू 

आता जरी ती नाही तरी तिच्या आठवणी आहेत 
मनामध्ये बरसणाऱ्या चिंब काही साठवणी आहेत 
वाटेवरचे गर्द झाड अजूनही हिरवे आहे 
अन मनामध्ये एक सतार कधीचीच वाजते आहे  

हरीश 

कधीतरी काहीतरी अचानक तुटून जाते 
कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक चालते होते 
सगळे सगळे संदर्भ व्यर्थ होतात 
दिशा अचानक अंधुक होतात 
भावनांच्या उधणापुढे शब्द अगदी मुके होतात 

अर्थांचे अनर्थ करणारे शब्द आता भिउन असतात 
 खोल डोहाच्या तळाशी स्तब्ध पाण्यासारख होऊन जात मन 
 ना तरंग ना खळबळ ना आपण ना शेजारी 
 फक्त उरते शांततेचे मौन 
 
धुके पसरते सर्वत्र  आठवणींचे ,प्रसंगांचे 
छोट्या छोट्या जगण्याला जोडलेल्या सवयीचे 
एखादा झगझगीत क्षण अन एखादा टोकाचा काळोख 
दिसेल न दिसेल होतो त्या धुक्यात 
 
जग खर तर तसेच असते 
तेच रंग तीच रूप तीच सुरावट अन तेच आलाप 
 त्याच वेड्या वाटा अन तेच सगळ प्राक्तन 
 जाणवत पण कळत नाही ,अन 
 कळल तर वळत नाही 
 आजूबाजूला साचून असत ते फक्त स्तब्ध शांततेच मौन …… 
काही गोष्टी फार खोलात जाऊन तपासू नयेत 
त्यांचे पडसाद आयुष्य हादरवणारे  असतात
गृहीतक बदलू शकतात 
आठवणी जाळू शकतात 
मनामधली कोवळीक संपून जाऊ शकते 
खरच फार खोलात नेहमी जाऊ नये 

एका मोठ्या अंतरामध्ये खूपस काही घडलेलं असत 
काही समजून घेण्यासारखं तर काही न उमजणार 
एका क्षणाला घोर वंचना समोर येऊ शकते 
हाती फुले समजून डोळे उघडेपर्यंत त्याची माती होऊ शकते 
खरच फार खोल डोहात नेहमीच जाऊ नये 

असच सहजी घडेल अन मनाला कवेत घेईल 
अस तर खर कधीच नसत 
अन कधीकधी  आयुष्य माणसांसकट बेमालूम फसवून जात 
आपल आपल्यापाशी राहून जात 
आपल समजून वाटलेलं उकिरड्यावर सापडत 
खरच फार खोल डोहात कुणाच्या डोकावू नये 
फार कोणाला आपल मानू नये 

आपल्याला आपण शिंपल्याप्रमाणे  बंद ठेवावे
खोल खोल मनात मिटून घ्याव 
उबदार आबदार वातावरणात हळूहळू विरघळून जाव 
फार फार आपल कोणालाही मानू  नये 
खोल आपल्याला अथवा कोणाला आपण जाणून  
परत मोडून जाऊ नये 

हरीश 
एकटेपण जपून ठेवावे 
सुरेख कवितेच्या ओळीसारखे 
तटस्थ रहावे योगी व्हावे 
चिडचिड तडफड दूर करावी 

आपल्यातुनच बाहेर राहून आपल्याला 
अन इतरांना बघत रहावे 
क्षण वाहणारच वाहू द्यावे 
ओंजळीत त्यांचे निष्कर्ष धरावेत 

सुख आनंद लालसा आणि 
वेदना दुक्ख क्रोध अन आत्मक्लेश 
जमेल तेवढे वेगळे करावे 

आपले असे काय असते अन का असावे 
याचा नीट विचार करावा 
आयुष्याचे चिवट धागे स्वतःभोवती 
गुफुन घ्यावे 

सोबत असेल सोबत नसेल 
आठवणी मात्र कायम असतील 
अनेकदा कड्यावरून कोसळताना 
त्यांचा मात्र आठव करावा 

एकटेपण जपून ठेवावे 
सुरेख कवितेच्या ओळीसारखे 
होता होता त्यामधून सुरेल गीत स्फुरत जावे  …
आपल्या मनाचे हसू हलकेच आपल्यावरती पसरत जावे …। 

हरीश 
  


सगळ्याला अपेक्षांचं कोंदण कशाला गुंफायच 
एखाद  नात आहे तस फुलू द्यायचं 
बघावास वाटल तर बघत रहायचं 
हसावस वाटल तर हसायचं 
रुसावस वाटल तर रुसायचं 
अन रागाववास वाटल तर रागवायचं देखील 

हवेत कशाला वेडे हट्ट 
हवेत कशाला स्पर्शांचे सोहोळे 
आयुष्याच्या अमर्याद पटावर 
जमेल तेवढ बरोबर चालायचं 
सहवासाच मनस्वी अत्तर जमेल तेवढ 
अंगावर उडवायचं 

शेवटी काय एकटेपण असतच 
तुम्हाला असत तस  समोरच्याला असतच 
कोणी दाखवत कोणी दाखवत नाही पण  
मनातल ओल तळ हळूहळू आटतच असत 

शब्दांचे सुरेल गोफ कडवट कशाला करायचे 
आपल्या हट्टापायी कोणाच्या नेत्री पाणी का आणायचे 
निरागस आनंद अन निर्वाज्य प्रेम हेच तर एक खरे असते 
त्या खऱ्या आनंदाला उगाच का मुकायचे 
जमेल तेवढे सोनेरी क्षण एकमेकात वाटून घ्यायचे !


हरीश 

 

रोजच आपण निश्चय करावा 
हसरा दिवस घालवायचा 
हिरमोड करणाऱ्या क्षुल्लक गोष्टी सोडाव्यात 
घोंगावत आलेली अकल्पित वादळ परतवावीत 
मनाला खोल झाकून ठेवाव 
त्याला फार गोंजारून उदास होऊ नये 
रोजच आपण निश्चय करावा 

सहवासाच टवटवीत फुल जगाला देऊ कराव 
अन जगाकडून घेऊ पहाव 
छोट्याशा आनंदाने निर्भेळ हसावं 
त्याआड लपलेले आसू  घात करू पहातील 
त्यांना पराभूत कराव 
रोजच आपण निश्चय करावा 

आपण देण लागत असतोच खूपस 
नात्याचं आयुष्याच जबाबदारयांच 
ते पूर्ण करताना एखादी विसाव्याची सावली 
मिळाली तर ती गमावू नये 
छोटे छोटे आनंद पेरत जावे 
आपल्याला आपण शोधत जावे 
रोजच आपण निश्चय करावा   

शेवटी काय सवय सगळ्याची होते 
अन वेळही सगळ्यांची येते 
मधल्या या प्रवासात जमतील तेवढ चांदण जमवाव 
हात पकडावेत मन जिंकावी 
खरोखर म्हणत जाव 
कभी पलको पे आसु है ,
कभी लबपे शिकायत है 
मगर ऐ जिंदगी फिरभी 
मुझे तुझसे मोहोब्बत है !

हरीश 
सर अशी पावसाची आसमंतात पसरते
सर्वत्र चैतन्याचे झरे स्त्रवू लागतात  
तसे मन हे जास्त जास्त गिरक्या घेऊ लागते 
बरचस कल्पनेतलं थोडस सत्यातल काहीस मनातलं 
किनारा सोडू लागत 

थेम्ब टपोरे होतात तसे डोळे धूसर होतात 
हिरव्या आसमंतात फिरताना धुक्यासारखे पाणावतात 
एक एक हिरवं पान मनाला खुणावत 
अन घरट्यात चिंब भिजलेलं पाखरू अलगद मनातही उतरत 

अशा रेशमी वेळा जगता आल्या का .. एक मन विचारत 
अर्थातच त्याशिवाय का आता येथून हलू  नयेस वाटतंय
पाण्यामध्ये भिजून विरघळलेले सल अजूनही हसतात स्वतःशी 
 आसासून जगलेले क्षण आजही दिलदारपणे हसतात  

पोळत भिजत काकडत गोठत जगणं तर इथवर आलंच आहे 
एक एक धडा शिकताना मनही आता तर पूर्ण बदललंय 
नेहमीच सगळ्या आशा अन स्वप्न पूर्ण झाल्या नसल्या 
तरी सगळ्या सगळ्या भावनांचा गोफ खराखोटा खेळून झालाय 

तो तुडुंब भरलेला ढग अन त्याभोवती नक्षीसारखी चमकणारी वीज 
अन त्या मुग्ध सावळ प्रकाशात अजूनही भिजू शकणारा वर्तमान 
आजही त्यासाठी उगवणारे कोवळे हिरवे अंकुर अन ओठावर येणार गाणं 
कुणाचा आकंठ मायेत भिजलेला स्पर्श अन जवळ घेणारी नजर 
फक्त पाऊसच देऊ शकतो .........  

हरीश 
 
प्रत्येकाच्या मनात वेगवेगळा पाऊस 
कुणाला हसवणारा कुणाला रडवणारा 
कुणाला नकोसा कुणाला हवासा 
छत्रीच्या आठवणींचा रेनकोटच्या एकटेपणाचा 
कुणाचा बेभान चिंब तसेच निथळण्याचा पाऊस 

पाऊस कौलारू घरामधला 
पाऊस पत्र्यावर तडतड वाजणारा 
पाऊस भिंतीवरून तसाच खाली ओघळणारा 
पाऊस पागोळ्यांचा 
पाऊस आसऱ्याशिवाय जाब विचारणारा 

पाऊस रानवनातला पाऊस दऱ्याखोऱ्यातला 
पाऊस कच्च्या रस्त्यावर चिखल करणारा 
पाऊस डांबरी रस्ते अन काँक्रीटचे जंगल 
धुवून काढत कधी त्यांना न जुमानणारा 

पाऊस मनाला खुलवणारा 
पाऊस सगळं बदलणारा 
आर्त गाणी आठवणारा 
हुरहुरती गाणी गुणगुणणारा 
  
पाऊस अनावर उत्सुक 
ओठांची अनामिक थरथर 
पाऊस कधी उदास 
डोळ्यातून बरसणारा 
पाऊस कधी लपवलेला 
हलकेच स्वरांत डोकावलेला 

पण तरीही कसाही बरसला 
तरी सच्चा आत एक अन बाहेर एक नसलेला ...... 

हरीश