अशीच भेट व्हायची होती
गोष्ट अशीच लिहिलेली होती
मन मनात विरघळले तरी
रस्ते वेगळे असायचे होते
आपापला चंद्र सांभाळायचा होता
आपापली गाणी म्हणायची होती
सुरेल ताल जमवत आपल्या पंखांत
उमेद भरून घ्यायची होती
हातात हात असता तर
श्वासात श्वास असता तर
आनंदाच्या डोहामध्ये
नकळत पैलतीर गाठला असता तर
जर आणि तर .. उगाचच विसर
असेच जर जळायचे होते
असेच जर झुरायचे होते
तर अशा अर्धस्फुट भेटीचे
प्रयोजन तरी काय होते ?
असं सुद्धा काही असत
असं सुद्धा काही जगत
असं सुद्धा समांतर असून
वेगळंवेगळं आयुष्य मिळत
असं घेरणार एकटेपण
आणखीनच गर्द होण्यासाठी
अन तरीही त्याच्या सावलीमध्ये
अशा आठवणी जपण्यासाठी
आयष्य समृद्ध होण्यासाठी
मनात दिवा तेवण्यासाठी
कितीही मन विझलं तरी
स्मिताची रेषा उमटण्यासाठी
असच सगळं घडायचं होत
समजून उमजून हसायचं होत
हरीश
No comments:
Post a Comment