Thursday, 3 November 2016

एखादा वेडा पाऊस डोळ्यांची कड भिजवून जातो 
तेव्हा समजावे की ती तुमच्या निकट आहे 
पावसाचा स्पर्श म्हणजे तिचाच स्पर्श 
ओल्या मातीचा गंध म्हणजे तिच्या भावनांचा अर्थ 
अन टपटपणारे पाणी म्हणजे तिचे अनवट शब्द     

इंद्रधनुचे रंग दिसले की मनाचा ऋतू बदलावा  
सप्तरंगात उत्कट आठवणींचा झरा वहावा 
जरा हसून पाहिलं तर कदाचित तीही दिसेल 
सूर्यकिरण चेहेऱ्यावर घेऊन ती कोवळ हसत असेल 

हिरव्यागार पाऊलवाटेवर जेव्हा आपण चालत असू 
ढगांमध्ये चमकणारी वीज आपण पहात असू 
अवेळी चिवचिवणारी पाखरे बघून चिंता करत असू 
अन अलगद हात हातात गुंफून डोळ्यांमध्ये पहात असू 

आता जरी ती नाही तरी तिच्या आठवणी आहेत 
मनामध्ये बरसणाऱ्या चिंब काही साठवणी आहेत 
वाटेवरचे गर्द झाड अजूनही हिरवे आहे 
अन मनामध्ये एक सतार कधीचीच वाजते आहे  

हरीश 

No comments:

Post a Comment